महाराष्ट्र

९९ वा साहित्य संमेलनाला गालबोट; कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णीवर थेट हल्ला

साताऱ्यात सुरू असणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना एका तरुणाने काळे फासण्याचा प्रकार घडला.

सातारा : मराठी साहित्यविश्वाचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ९९ वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना एका तरुणाने थेट काळे फासल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे संमेलनस्थळी एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी घडली. संदीप जाधव असे या तरुणाचे नाव असून तो अचानक कार्यक्रमस्थळी आला आणि त्याने विनोद कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर काळे फासले. या घटनेनंतर त्याने ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणा दिल्या तसेच राष्ट्रगीतही म्हटले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित साहित्यिक, मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

काळे फासण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संदीप जाधव याला ताब्यात घेतले. घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संमेलनस्थळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना विनोद कुलकर्णी यांनी ठाम भूमिका मांडली. “माझ्यावर हल्ला का झाला, याची मला कोणतीही माहिती नाही. माझा प्राण गेला तरी मला पर्वा नाही; पण मी माझे काम थांबवणार नाही. पोलिसांनी आरोपीचा सखोल तपास करावा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, या घटनेची पोलीस नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. हा प्रकार वैयक्तिक नाराजीमुळे घडला की यामागे काही संघटित कारण आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

मराठी साहित्याच्या उत्सवाला अशा प्रकारच्या घटनेचे गालबोट लागल्याने साहित्यिक वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे. संमेलनासारख्या सांस्कृतिक आणि वैचारिक व्यासपीठावर घडलेला हा प्रकार गंभीर मानला जात असून, सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button