
नारायण राणे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी कालच आपल्या भाषणात राजकीय संन्यास घेण्याचे, राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. आता, वय झालंय, थांबायला हवं असे त्यांनी म्हटलं होतं.
चिपळूण: भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात भाषण करत असताना त्यांना भोवळ आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
कार्यक्रमादरम्यान राणे भाषण करत होते. भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांचा आवाज बसल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. काही वेळानंतर त्यांना चक्कर आल्यासारखं वाटू लागलं, त्यामुळे त्यांनी भाषण आटोपत घेतलं. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि आयोजकांनी तात्काळ धावपळ करत त्यांना आधार दिला.
विशेष म्हणजे, कार्यक्रमानंतर माध्यमांनी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर ते थेट कार्यक्रमस्थळावरून गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. सध्या ते विश्रांती घेत असून डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, कालच नारायण राणे यांनी एका भाषणात राजकीय संन्यासाचे संकेत दिले होते. “आता वय झालंय, थांबायला हवं,” असं वक्तव्य त्यांनी केल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या आरोग्याबाबतच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व मानले जातात. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांसह विविध राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.



