‘मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली, आता माळाकोळी सांभाळणार’ पंकजा मुंडे

नुकत्याच आपल्या भाषणात भाजपा मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीबद्दल मोठे विधान केले आहे. जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली… आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात… मी परळी इतकेच माळाकोळीवर प्रेम करते. मी आता माळाकोळी सांभाळणार.. परळीवरचे प्रेम धनुभाऊंना करू द्या… मी त्यांना परळी देऊन टाकली. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या…
बीड: राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पक्षांतरे, तर काही ठिकाणी कट्टर विरोधकांची युती पाहायला मिळत आहे. अशाच पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका जाहीर वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
परळी हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा हा मतदारसंघ असून, त्यांनी येथूनच राजकारणात आपली मजबूत पकड निर्माण केली होती. अनेक वर्षे भाजपची एकहाती सत्ता परळीत राहिली. मात्र, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर परळीत राजकीय समीकरणे बदलली आणि एनसीपीची ताकद वाढली.
यामुळे परळी हा मतदारसंघ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला. दोघांमधील मतभेद आणि राजकीय चुरस राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, अलीकडच्या काळात भाऊ-बहिणीमध्ये समेट झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये परळीतून नक्की कोण लढणार, याबाबत सातत्याने चर्चा सुरू होत्या.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चांना नवे वळण दिले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या,
“मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली आहे. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. मी परळीइतकेच माळाकोळीवर प्रेम करते. आता माळाकोळी मी सांभाळणार आहे. परळीवरचं प्रेम धनुभाऊंना करू द्या.”
इतकंच नव्हे तर, “तो त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांनी तिथे प्रेम करावं. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या,” असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
माळाकोळी हा मतदारसंघ दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना विशेष प्रिय होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत माळाकोळीला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी माळाकोळीबाबत केलेले विधान हे केवळ भावनिक नसून, आगामी निवडणुकांसाठीचे स्पष्ट राजकीय संकेत असल्याचे मानले जात आहे.



