अखेर प्रतीक्षा संपली; बीएमसी निवडणुकीचा बिगुल वाजला

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या राजकीय आणि आर्थिक सत्तेचा किल्ला कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक आगामी वर्षात 15 जानेवारीला होणार असूण, मतमोजणी 16 जानेवारी रोजी करण्यात येईल. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. .
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुकीबाबत अखेर मोठी घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले की मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर 28 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी पार पडेल. त्यामुळे जवळपास साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या बीएमसी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात नगरपालिका निवडणुकांसाठी सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकानी यांनी दिली. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. तब्बल साडेतीन वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमुळे शहराच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, बीएमसी निवडणुकांची घोषणा मुंबईतील कथित ‘वोट चोरी’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. मतदार याद्यांमध्ये बनावट आणि डुप्लिकेट नावे जोडल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मतदार यादी स्वच्छतेची प्रक्रिया सुरू केली आहे.
याचवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शहरातील 227 प्रभागांमध्ये समांतर पातळीवर प्रत्यक्ष सत्यापन मोहीम हाती घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे की या मोहिमेदरम्यान हजारो बनावट आणि डुप्लिकेट मतदारांची नावे उघडकीस आली आहेत. तसेच, अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या, विशेषतः मराठी मतदारांना चुकीच्या पद्धतीने ‘डुप्लिकेट’ ठरवण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे, ज्यामुळे त्यांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ शकते.
बीएमसी निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, शिवसेनेच्या 2022 मधील फुटीनंतरची ही पहिलीच बीएमसी निवडणूक आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा थेट सामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत तसेच सत्ताधारी भाजपप्रणीत महायुतीशी होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या राजकीय आणि आर्थिक सत्तेचा किल्ला कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



