नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात, १७ हजार घरे स्वस्तात उपलब्ध

हा निर्णय विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या वर्गातील घरांच्या किमतीत १० टक्के कपात करण्यात येणार असल्याने, मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना नवी मुंबईत स्वतःचे घर घेणे अधिक सुलभ होणार आहे.
नवी मुंबई: नवी मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सिडकोकडून बांधण्यात आलेल्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे तब्बल १७ हजार घर खरेदीदारांना थेट दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या नवी मुंबईतील महत्त्वाच्या भागांमध्ये सिडकोने मोठ्या प्रमाणावर घरे उभारली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे.
EWS आणि LIG घटकांना विशेष फायदा
हा निर्णय विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या वर्गातील घरांच्या किमतीत १० टक्के कपात करण्यात येणार असल्याने, मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना नवी मुंबईत स्वतःचे घर घेणे अधिक सुलभ होणार आहे.
‘परवडणारी घरे’ हेच सरकारचे ध्येय
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, यापूर्वीही नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचे निर्णय घेण्यात आले होते आणि त्याच धोरणाचा पुढचा टप्पा म्हणून हा निर्णय घेतला आहे. सिडकोची ही घरे केवळ किफायतशीरच नाहीत, तर चांगल्या ठिकाणी असून आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार
सरकारच्या या निर्णयामुळे नवी मुंबईत घर खरेदी करण्याची तयारी करणाऱ्या हजारो कुटुंबांना थेट फायदा होणार आहे. लॉटरी प्रक्रिया पूर्ण होताच अनेक नागरिकांना स्वतःच्या हक्काच्या घराची चावी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, ‘घरकुलाचे स्वप्न’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे.



