Shivraj Patil Passes Away: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन; राज्यभरातून शोक व्यक्त

ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमहाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मोठे योगदान देणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि लातूरचे दिग्गज लोकनेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज लातूरमध्ये निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ‘देवघर’ येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. लातूरमध्येच उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
लातूर: शिवराज पाटील हे मराठवाड्यातील अत्यंत प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व मानले जात होते. त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात तब्बल पाच दशकांपेक्षा जास्त काळ काम केले होते.
लातूर, मराठवाडा आणि महाराष्ट्रभरातून शोककळा
शिवराज पाटील हे लातूर आणि मराठवाड्याच्या राजकारणातील आधारस्तंभ मानले जात. त्यांच्या निधनानंतर लातूरमध्ये शोककळा पसरली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) प्रमुख शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अजित पवार यांसह राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहत, “महाराष्ट्राने एक अत्यंत सुसंस्कृत, अभ्यासू आणि धोरणात्मक नेते गमावले आहेत.” या शब्दात आपले दुःख व्यक्त केले.
महाराष्ट्रातील राजकारणातील त्यांच्या प्रवासाची महत्त्वपूर्ण पावले
१२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यात जन्मलेल्या पाटील यांनी आपला राजकीय प्रवास लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष (१९६६–१९७०) म्हणून सुरू केला. त्यानंतर ते दोन वेळा विधानसभेत निवडून आले आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आणि सभापती म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली.
लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवणारे ते महाराष्ट्रातील दुर्मिळ नेत्यांपैकी एक होते. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी सांभाळली आहे.
काँग्रेस सरकारमध्ये पाटील यांनी संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, वाणिज्य अशा अनेक मंत्रालयांची धुरा सांभाळली. २००४–२००८ या काळात ते देशाचे गृहमंत्री होते.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, ही त्यांच्या नैतिकतेची जाणीव करून देणारी घटना होती. नंतर ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक (२०१०–२०१५) म्हणूनही कार्यरत होते.
महाराष्ट्रात चर्चेत राहिलेले प्रसंग
पाटील यांनी कधीही आक्षेपार्ह भाष्य न करता संयत राजकारण केले, अशी प्रतिमा राज्यात त्यांच्या नावावर होती. ते संविधान, कायदा आणि प्रशासकीय विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जात.
मराठी, हिंदी आणि इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्व आणि संसदीय कारभारातील त्यांची पकड महाराष्ट्रातील तरुण नेत्यांसाठी आदर्श मानली जात असे.
राष्ट्रानेत्यांकडून शोक संदेश
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “शिवराज पाटील हे माझ्यासाठी वडिलांसारखे. मराठवाड्यातील राजकारणाला दिशा देणारे ते मोठे मार्गदर्शक होते.” तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “महाराष्ट्राने एक सुसंस्कारित, नीतीनिष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले आहे.” या शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली. लातूरचे आमदार अमित देशमुख यांनीही श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, पाटील यांनी लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योगदान दिली आणि त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.
शिवराज पाटील हे मराठवाड्याच्या राजकीय परंपरेतील सभ्य, संयमी, तर्कशुद्ध आणि उच्च नैतिक मूल्ये जपणारे नेते म्हणून नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.



