घाटकोपरला दिलासा! पाण्याच्या प्रश्नावर आमदार राम कदम यांचा ४ वर्षांचा संकल्प अखेर पूर्ण

मुंबईतील घाटकोपर पश्चिम परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक आमदार राम कदम यांनी तब्बल चार वर्षांनंतर आपले केस कापून नागरिकांसमोर आपला संकल्प पूर्ण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
घाटकोपर: मध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा ही अनेक वर्षांपासूनची समस्या होती. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होईपर्यंत केस न कापण्याचा निर्धार आमदार राम कदम यांनी केला होता. आता जलपुरवठा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा सुरू झाल्याने त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला आहे.
वृत्तसंस्था ANI ला दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर परिसरात आता दोन कोटी लिटरपेक्षा अधिक क्षमतेचे पाण्याचे टँक उभारण्यात येत आहेत. तसेच भांडुप ते घाटकोपर दरम्यान सुमारे चार किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी जोडण्यात आली असून हे काम अंतिम टप्प्यात आहे.
यासंबंधीत माध्यमांशी बोलताना राम कदम म्हणाले, “घाटकोपरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. आता दोन कोटी सात लाख लिटर क्षमतेचे टँक उभारले जात असून नवीन जलवाहिनीमुळे नियमित पाणीपुरवठा शक्य होणार आहे. यामुळे मला प्रचंड समाधान मिळाले आहे.” ही सुधारित जलपुरवठा व्यवस्था राज्यातील तसेच देशातील इतर भागांतही राबवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाच वर्षांपूर्वी डोंगराळ भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा केलेला अभ्यास आज घाटकोपरसाठी उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राम कदम यांची राजकीय पार्श्वभूमी
राम कदम 2009 मध्ये प्रथम मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. त्या काळात अबू आसिम आजमी यांच्याशी झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणात त्यांना अन्य तीन आमदारांसह निलंबित करण्यात आले होते. आठ महिन्यांनंतर निलंबन मागे घेण्यात आले. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. पुढे त्यांची भाजपचे प्रवक्ते म्हणूनही नियुक्ती झाली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राम कदम यांनी 73,171 मतांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार संजय दत्ताराय भालेराव यांचा पराभव केला.



