महाराष्ट्र

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: दादर येथील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही,” असे ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेतील दीर्घकालीन सत्तेवर टीका करत त्यांनी मराठी माणूस मागे पडल्याचा आरोप केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा-महायुतीचे प्रमुख नेते व इतर मान्यवर उपस्थित होते.

विरोधकांच्या प्रचारावर भाष्य करताना त्यांनी नक्कल आणि भाषणशैलीसंदर्भात टीका केली. “कालच्या सभेत काहींनी नक्कलही करून दाखवली, नक्कल करून काकांच्या पक्षाचे काय झाले इतकेच त्यांनी लक्षात ठेवावे. काकाकडे किमान नक्कल करण्याची आणि भाषण देण्याची तरी कला आहे, तुमच्याकडे तर तेही नाही.” असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर 5 वर्षांमध्ये नवी मुंबईमध्ये विमानतळ उभारले आणि आता तिसरे विमानतळ देखील तयार करणार आहोत. तसेच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दीडपट विस्तार देखील करणार आहोत. विरोधकांना स्वतःच्या घराची जागा कमी पडली म्हणून त्यांनी स्वतःचे घर बदलले, मग मुंबईच्या आर्थिक विकासासाठी आम्ही नवीन विमानतळ उभारले, तर इतका विरोध का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

भाषाविषयक धोरणांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “आमच्या महायुती सरकारने त्रिभाषा सूत्राचा अहवाल मांडला, त्यात असे सांगितले की दोन भाषा कोणत्याही घ्या, पण मराठी सक्तीचीच राहणार. याउलट काही लोकांनी मुख्यमंत्री असताना इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची केली, परंतु ते आता ‘गजनी’ झाले आहेत, त्यांना हे आठवणार नाही. त्यांना कदाचित हेही आठवणार नाही कि, हिंदी सक्तीच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वाक्षरी केली होती! मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे तेव्हाच स्पष्ट झाले आहे.”

मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांबाबत माहिती देताना त्यांनी बीडीडी चाळ, पत्राचाळ आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. मेट्रो व बससेवांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले. “आमच्या महायुती सरकारने मुंबईमधील बीडीडी चाळीतील लोकांना हक्काचे घर दिले, पत्राचाळीतील लोकांना देखील हक्काचे घर दिले, मेट्रो आणि बससेवांमधून मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला. धारावीतील लोकांनाही पुनर्विकासातून हक्काचे घर देणार आहोत. खऱ्या अर्थाने मुंबईकरांचा विकास महायुती सरकार करत आहे. आता आम्ही केलेला विकास पाहून कोणाला मिर्ची झोंबली असेल, तर त्याला आमचा नाईलाज आहे.” असे त्यांनी पुढे म्हंटले.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना फडणवीस यांनी 2014 नंतर भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला आणि रोजगारनिर्मितीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. मुंबईतील तरुणांना रोजगार आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आगामी 15 तारखेला होणाऱ्या मतदानात महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button