महाराष्ट्र
Trending

भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर! नव्यांच्या येण्याने जुने निष्ठावंत कार्यकर्ते भडकले

नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. पक्षप्रवेशावरून भाजप कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ठाकरे गटाचे नेते व माजी महापौर विनायक पांडे, मनसे नेते यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे आणि माजी आमदार नितीन भोसले यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला.

नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते व माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि शाहू खैरे यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध झाला. भाजप कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. अखेर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत संबंधित नेत्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्यात आला.

नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद?

भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनीही या प्रवेशावर आक्षेप घेतल्याने परिस्थिती अधिक चिघळली. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये थेट वाद होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. जवळपास तासभर हे नेते भाजप कार्यालयाबाहेर थांबून होते.

दरम्यान, शहरातील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अखेर संबंधित नेत्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्यात आला.

या घटनेमुळे नाशिकमधील भाजपमधील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीतील समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. आगामी काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button