महाराष्ट्र

‘राहुल नार्वेकर स्वतःला अनिल कपूर समजतात’ उद्धव ठाकरे यांचा टोला, तात्काळ निलंबनाची मागणी


मुंबई : मुंबईतील राजकीय वातावरण तापवणारी प्रतिक्रिया देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करत राहुल नार्वेकर यांचं तात्काळ निलंबन करावं, अशी जाहीर मागणी शिवसेना भवनात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे हा वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी नार्वेकरांवर जोरदार शब्दांत टीका करत “राहुल नार्वेकर स्वतःला अनिल कपूर समजतात” असा उपरोधिक टोला लगावला.

नेमकं काय झालं?

अलीकडेच मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावण्यात आल्याचे आरोप समोर आले. या प्रकरणात राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आलं असून, सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांमुळे विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या व्यक्तीची निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांनी घटनात्मक पदावर राहून अशी वागणूक देणं शोभत नाही. विरोधी उमेदवारांना धमकावणं, दबाव टाकणं हे लोकशाहीला घातक आहे. अशा व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही.” यावेळी त्यांनी आणखी एक टोला लगावत म्हटलं, ” ते स्वत:ला नायक चित्रपटातील अनिल कपूर समजतात. संरक्षण काढून घेण्याचा अधिकार त्यांना नसतो. दमदाटी करून बिनविरोध निवडणुका केल्या. मतदारांना मतदानाचा अधिकार नाकारला आहात. पुन्हा निवडणूक प्रक्रिया तिथल्या घेतल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांचे गुलाम समजले जातील,” त्यांनी निवडणूक आयोग आणि राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशीही मागणी केली.

या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नाही. उद्या तुम्ही गेल्यानंतर जेव्हा दामदुपटीने सगळं सुरु होईल तेव्हा त्याची तक्रार करु नका. आपण सत्तेतून कधी बाजूला होणार नाही असं वाटत असेल तर तो भ्रम दूर झाला पाहिजे. जेव्हा दुसरे सत्तेत आल्यानंतर याहून वाईट होईल त्याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा. आपण चुकीचे पायंडे पाडत नाही ना याचा नीट विचार केला पाहिजे. हे महाराष्ट्राचं युपी, बिहार करत आहेत हे मी 10 वर्षांपासून सांगत आहे. अशा प्रकारे वाटोळं करणं, राजकारणात येणाऱ्यांची विचारसरणी बदलणं हे घातक आहे. आज जर प्रोत्साहसन दिलं तर नंत काय वाट्याला येणार आहे हे ओळखावं,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी नार्वेकरांवर टीकेची झोड उठवली असून, सत्ताधारी महायुतीकडून मात्र हे आरोप फेटाळले जात आहेत.दरम्यान, राहुल नार्वेकर किंवा सत्ताधारी पक्षाकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button