महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खाते उघडले

अहिल्यानगरमध्ये कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड

अहिल्यानगर : आगामी महापालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वीच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनाही पहिला राजकीय विजय मिळाला आहे. अहिल्यानगर महापालिकेतील प्रभाग क्रमांक ८ ‘ड’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीत आपले खाते उघडले आहे.

प्रभाग क्रमांक ८ ‘ड’ मध्ये कुमार वाकळे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननी प्रक्रियेनंतर पोपट कोलते यांचा अर्ज वैध ठरला होता. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पोपट कोलते यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

या बिनविरोध निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अहिल्यानगरमध्ये विजयी जल्लोष करण्यात आला असून, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ही पहिलीच यशस्वी सुरुवात मानली जात आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. महापालिका निवडणुकांमधून स्थानिक पातळीवर पक्षांची ताकद स्पष्ट होणार असून, बिनविरोध निवडींमुळे पक्षांचे संघटन आणि स्थानिक नेतृत्वाची पकड दिसून येत आहे. अहिल्यानगरमधील या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आगामी प्रभागांमध्ये आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या यशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ही निवडणूक आशादायी ठरेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button