ठामपा निवडणुकीत उमेदवाराचा अर्ज बाद केल्याबद्दल, अविनाश जाधव आक्रमक

अविनाश जाधवांचा आमरण उपोषणाचा निर्णय
ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान ठाकरे गटाच्या एका उमेदवाराचा तसेच मनसेच्या एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज (गुरुवारी) आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील प्रभाग क्रमांक १७ मधून शिंदे गटाचे उमेदवार मनोज शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १८ मधून मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्जही अवैध घोषित करण्यात आला आहे.
याबाबत मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीला अवघे काही मिनिटे शिल्लक असताना काही कागदपत्रे राहिल्याचे सांगण्यात आले. ती कागदपत्रे वेळेत घेऊन पोहोचूनही पोलिसांनी कार्यालयात प्रवेश नाकारला. काही वेळानंतर प्रवेश दिला असता, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून न घेता कागदपत्रांच्या अभावाचे कारण देत अर्ज अवैध ठरवला. यावर आक्षेप घेतला असता वेळेत न आल्याचे कारण पुढे करण्यात आले, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी पक्षपातीपणे आणि अन्यायकारक पद्धतीने अर्ज बाद केल्याचा आरोप मनसेसह इतर काही उमेदवारांनी केला आहे. सत्ताधारी पक्षातील उमेदवारांच्या अर्जांमध्ये गंभीर त्रुटी असूनही ते वैध ठरवण्यात आले, मात्र विरोधी पक्ष आणि काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या कथित अन्यायाविरोधात मनसे नेते अविनाश जाधव हे अर्ज बाद झालेल्या उमेदवारांसह संबंधित निवडणूक कार्यालयात आमरण उपोषणाला बसणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी आणि अन्यायकारक निर्णय मागे घ्यावेत, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेसह सर्वच इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मनसेकडून एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी संबंधित निवडणूक कार्यालयात पार पडली. वागळे इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ या प्रभागांतील उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.
या घडामोडींमुळे ठाणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काळात या प्रकरणावर कायदेशीर किंवा प्रशासकीय पातळीवर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



