महाराष्ट्र
Trending

प्रभाग 217 मधून ठाकरे शिवसेनेचा उमेदवार अखेर जाहीर, शशिकांत पवारांना उमेदवारी

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाकडून प्रभाग क्रमांक २१७ साठी शशिकांत पवार यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही उमेदवारी जाहीर करण्यात आली असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 217 मधील राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. आतापर्यंत या प्रभागातून ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवार जाहीर झालेला नव्हता. मात्र आता मिळालेल्या नवीन अपडेटनुसार, अखेर शाखाप्रमुख शशिकांत पवार यांना ठाकरे शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रभाग 217 मध्ये शशिकांत पवार यांचे नाव आधीपासूनच चर्चेत होते. स्थानिक शाखाप्रमुख म्हणून ते दीर्घकाळ कार्यरत असून, त्यांच्या कामाचा आणि संपर्काचा फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो, अशी चर्चा होती. अखेर पक्ष नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने या प्रभागात निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना शशिकांत पवार म्हणाले, “शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी प्रभागातील जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून सार्थ ठरवेन.”

मनसे–ठाकरे गट आघाडीचा परिणाम

या प्रभागात मनसेकडून निलेश शिरधनकर इच्छुक असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांच्या प्रभावाबाबत स्थानिक पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. ठाकरे गट–मनसे आघाडी अंतर्गत ही जागा ठाकरे गटाला मिळाल्याने शशिकांत पवार यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.

भाजपकडून गौरंग झवेरींना एबी फॉर्म

दरम्यान, भाजपकडून प्रभाग 217 साठी गौरंग झवेरी यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. मात्र गौरंग झवेरी हे स्थानिक नसल्याचा आरोप होत असून, त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. ही नाराजी ठाकरे गटासाठी अप्रत्यक्ष फायदेशीर ठरू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काटेची टक्कर अपेक्षित

एकीकडे ठाकरे शिवसेनेकडून स्थानिक आणि लोकप्रिय चेहरा असलेले शशिकांत पवार, तर दुसरीकडे भाजपकडून बाहेरचे उमेदवार अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग 217 मध्ये काटेची आणि प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आता उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचाराला वेग येणार असून, येत्या काही दिवसांत या प्रभागातील राजकीय हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button