
राज्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पवार कुटुंबातील काका–पुतण्या पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ही जवळीक सध्या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरती मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे: मुंबईनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच आता पवार कुटुंबातील काका–पुतण्या पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटांमध्ये स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीत सीट वाटपावर चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सीट वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. शरद पवार गटाने चाळीस ते पंचेचाळीस जागांची मागणी केली असून, अजित पवार गट तीस जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चांवर अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे घेणार असल्याची माहिती आहे.
MNS ला मिळणार संधी?
या संभाव्य आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ला देखील काही जागा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी शिवसेना (UBT) कडून मनसेसोबत युतीबाबत चाचपणी करण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेस–शिवसेना (UBT)–मनसे अशी त्रिसूत्री युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता
या घडामोडींचा थेट परिणाम महाविकास आघाडीवर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट स्थानिक पातळीवर एकत्र येण्याच्या हालचाली करत असल्याचे स्पष्ट होताच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांनी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे. काँग्रेसकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला औपचारिक प्रस्ताव पाठवण्यात आला असून, जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेत एकूण 41 प्रभाग आणि 165 नगरसेवकांच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) समन्वय साधून उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही काही जागा दिल्या जाण्याची शक्यता तपासली जात असून, त्यामुळे पुण्यात त्रिपक्षीय आघाडी उभी राहण्याची चर्चा आहे.
अजित पवार गटासोबत युतीला काँग्रेसचा नकार
काँग्रेसने मात्र अजित पवार गटासोबत युती न करण्याची ठाम भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाच्या नेत्यांच्या मते, असा निर्णय दीर्घकालीन राजकीय हिताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पुण्यात युतीसाठी काँग्रेसशी संपर्क साधला होता, मात्र काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने पुण्यात आपली ताकद वाढवत विविध पक्षांतील 22 माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती न राहता, राज्यातील मोठ्या राजकीय पुनर्रचनेची नांदी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे बंधूंनंतर आता पवार कुटुंबातील काका–पुतण्या पुन्हा एकत्र येणार का, याकडे महाराष्ट्राचे राजकारण बारकाईने पाहत आहे.



