इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेत राडा, AIMIM कार्यकर्त्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. जलील यांच्या उपस्थितीतच पक्षातील दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला असून पाहता पाहता हा वाद फ्री-स्टाईल हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संभाजीनगर: इम्तियाज जलील हे पक्षाच्या प्रचारासाठी आणि जनसंपर्कासाठी वैजापूर दौऱ्यावर आले होते. पदयात्रेला सुरुवात होत असतानाच एमआयएममधीलच एका गटाने जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत उघडपणे नाराजी व्यक्त केली. ही नाराजी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी निवड, तसेच आगामी निवडणुकांतील उमेदवारीवरून असल्याची चर्चा आहे.
काळे झेंडे दाखवल्यानंतर पदयात्रेत सहभागी असलेले समर्थक आणि नाराज कार्यकर्ते आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही क्षणांतच हा वाद हिंसक झाला. इम्तियाज जलील यांच्या डोळ्यादेखतच कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी सुरू झाली. या प्रकारामुळे पदयात्रेत एकच गोंधळ उडाला आणि अनेक कार्यकर्ते जीव मुठीत धरून इधर-उधर पळू लागले.
गर्दी वाढत चालल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांच्या कारवाईनंतर हाणामारी थांबली आणि परिस्थिती काही वेळात नियंत्रणात आली. या घटनेत काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे, मात्र सुदैवाने कोणतीही गंभीर जखम झाल्याचे वृत्त नाही.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, एमआयएममधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. पक्ष नेतृत्वाकडून या प्रकारावर नेमकी काय भूमिका घेतली जाते, तसेच दोषींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



