महाराष्ट्र

EVM चा गोंधळ, मतदान आकडेवारीवर विवाद!

ज्याठिकाणी मतदान झाले त्याठिकाणी स्टाँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आले आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गोंदियाच्या सालेकसा येथे ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपावरून राडा झाला आहे तर सांगलीत मतदानात अचानक कशी वाढ झाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक: राज्यातील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले खरे, पण या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीनंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळात या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र हायकोर्टाच्या आदेशाने मतमोजणीची तारीख पुढे ढकलत २१ डिसेंबर निश्चित करण्यात आली.

EVM मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीत EVM मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना आणि शरद पवार गटातील उमेदवारांनी तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. सुमारे १२ तास कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. स्टॉंगरूममध्ये ठेवलेल्या मशिनचे सील तुटल्याची चर्चा पसरताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मतदान आकडेवारीत ‘अचानक वाढ’ झाल्याचा संशय

सांगलीतील आष्टा नगरपरिषदेतील वेबपोर्टलवर दिसणाऱ्या डेटा त्रुटींमुळे शरद पवार गट आणि शहर विकास आघाडीतील उमेदवारांनी संशय व्यक्त केला. वेबपोर्टलवरून मतदानाच्या टक्केवारीबाबत आकडेवारी मिळाली. एकूण मतदार संख्या ३३ हजार ३२८ दाखवली, एका प्रभागात १३११ मतदान असताना तिथे ४ हजार मतदान दाखवले आहे. ६ नंबर प्रभागात एकूण मतदान ३ हजार ५६ आहे. यात मतदान २३९४ झाले आहे तिथे १७९५ मतदान दाखवले आहे. अशा विसंगत आकडेवारीमुळे शेकडो कार्यकर्त्यांनी स्टॉंगरूमबाहेर गर्दी करून आक्षेप नोंदवला.

बावनकुळे यांची प्रतिक्रिया : “पराभवाची भीती आणि मानसिकतेतून आरोप”

विरोधकांचे आरोप फेटाळून लावत भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले, “स्टॉंगरूमबाहेर राज्य निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून पुरेशी काळजी घेतली जाते. पराभवाची शक्यता दिसू लागली की काही पक्ष जाणीवपूर्वक अशा भूमिका घेतात. नैराश्यातून आरोपांची मालिका सुरू होते.”

मतमोजणीचा दिवस जवळ येत असताना स्टॉंगरूम सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिकच तंग होत आहे. २१ डिसेंबरला मतमोजणी होईपर्यंत आरोप–प्रत्यारोपांचा हा सिलसिला आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button