महाराष्ट्र

विधान परिषदेत आ. प्रसाद लाड यांना अचानक लागला शॉक, नेमकं काय घडलं?

नागपूर येथील विधान परिषदेत सभागृहाचे कामकाज सुरू असताना आ. प्रसाद लाड यांनी आपल्याला अनेकदा शॉक लागत असल्याचे सांगितले. ते सभागृहात बोलण्यासाठी उभे राहताच त्यांना बाकावरून दोन ते तीन वेळा शॉक बसल्याचा दावा त्यांनी त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने एकीकडे सभागृहात चिंता पसरली, तर दुसरीकडे मिश्कील टिप्पण्यांमुळे हशा देखील पिकला.

नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू असून आज पाचव्या दिवशी विधान परिषदेत एक अनोखा प्रसंग घडला. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना अचानक शॉक लागला.

दरम्यान लाड म्हणाले, “मला इकडे शॉक बसतोय… मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल,” अशा शब्दांत त्यांनी परिस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या या मिश्कील विधानाने वातावरण थोडं हलकंफुलकं झालं.

त्यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर खाली बसलेल्या जागेतूनच म्हणाले, “तुम्हाला काही झालं तर पुतळा उभारू…” या प्रतिक्रियेने सभागृहात मोठा हशा पिकला. त्यानंतर शिवसेनेचे (उ.) नेते अनिल परब यांनी देखील टोमणा मारत सांगितले, “शॉक प्रकरणाची एसआयटी चौकशी करा.”

यावर त्वरित प्रतिसाद देताना दरेकर पुन्हा म्हणाले, “त्यांची आत्ताच एक चौकशी झाली आहे!” आणि पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.

दरम्यान, परिस्थिती गांभीर्याने घेत सभापती राम शिंदे यांनी लाड यांना आश्वस्त करत म्हटले, “तुम्ही सभागृहाचे ‘लाड’ आहात… तुम्हाला काही होऊ देणार नाही. काळजी घेतली जाईल.”

या प्रसंगानंतर सभागृहातील बाके आणि तांत्रिक व्यवस्थेची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून हा प्रकार नेमका कसा घडला याबद्दल कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. हिवाळी अधिवेशनात घडलेला हा अनोखा शॉकप्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button