हिवाळी अधिवेशनाबाबत सत्ताधाऱ्यांकडून गांभीर्याचा अभाव : हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

राज्यातील हिवाळी अधिवेशन केवळ एक आठवड्याचे घेऊन भाजप महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादर केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. शेतकरी, कामगार, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा अशा गंभीर प्रश्नांवर चर्चा न करता ‘कुत्री पकडा, बिबटे सोडा’ अशा गौण मुद्यांवर चर्चा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाचे अजिबात गांभीर्य नाही,” असे सपकाळ म्हणाले.
नागपूर : नागपूर विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. “दररोज भ्रष्टाचाराची नवी प्रकरणे समोर येत आहेत. पैशांचा उधळपट्टीचा बाजार मांडला आहे. ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ पासून सुरुवात झालेल्या घोषणांचा शेवटी ‘मिल बाँट के खायेंगे’ असा प्रवास झाला आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. राज्यातील वाढत्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका काढून चर्चा व्हायला हवी, परंतु सभागृहाचे कामकाजच सत्ताधारी सुरळीत चालू देत नाहीत, असेही त्यांनी म्हटले.
सपकाळ पुढे म्हणाले, “गंभीर विषयांवर चर्चा सुरू असताना सत्ताधारी सदस्य विनोद करत बसतात. लोकशाहीचा ‘काटलोट’ होत आहे. सत्ताधारी पक्षातीलच काही सदस्य भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत; तरीही सरकार डोळेझाक करत आहे.”
विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रश्नावर बोलताना सपकाळ म्हणाले, “१० टक्के सदस्यसंख्येच्या निकषाचा दाखला देण्यात येतो. वरच्या सभागृहात १० टक्के संख्या असून सरकारला प्रस्तावही देण्यात आला आहे. मग तेथे विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय का घेतला जात नाही? लोकशाहीतील परंपरा, प्रथा आणि संकेत पाळले जात नाहीत. दोन्ही सभागृहांचे प्रस्ताव असतानाही सरकार घटनाबाह्य पद्धतीने काम करत आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “फडणवीस ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने काम रेटत आहेत. लोकशाहीची बूज राखणे आवश्यक आहे. विरोधी पक्षनेतेपद देणे हा राजधर्म असताना त्यापासून सरकार पळ काढत आहे.”
सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना लोकशाहीचे संकेत पाळण्याचे आणि राज्यातील गंभीर प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.



