Maharashtra Bagging Ban: महाराष्ट्रात भीक मागण्यावर कायदेशीर बंदी! गोंधळात विधेयक मंजूर

विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता विधान परिषदेतही हे विधेयक पारित झाल्याने राज्यात लवकरच भीक मागणे बेकायदेशीर ठरणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हे विधेयक सभागृहात मांडले.
नागपूर: महाराष्ट्रात भीक मागण्यास प्रतिबंध घालण्यासाठी तयार करण्यात आलेले महत्त्वाचे ‘महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक’ विधान परिषदेत मोठ्या गोंधळात मंजूर झाले. या विधेयकातील शब्दप्रयोग, उद्देश आणि स्पष्टीकरणामध्ये विरोधाभास असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी केली. त्यामुळे या विधेयकावर १३ डिसेंबर रोजी सभापतींच्या दालनात पुनर्विचारासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र या विधेयकावर चर्चा करताना अनेक सदस्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. ज्यात आमदार मनीषा कायंदे, अमोल मिटकरी आणि तालिका सभापती नीलम गोऱ्हे यांचा समावेश असून त्यांनी विधेयकातील विसंगतींबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे.
महारोगी शब्द वगळण्यासाठी आलेल्या विधेयकाचा आणि त्याचे शीर्षक यात ताळमेळ नसल्याची प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसेंनी दिली. तर, विधेयकाबाबत माहिती दिलेल्या पुस्तिकेतील स्पष्टीकरणावर नीलम गोऱ्हेंनी असमाधान व्यक्त केले. सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असतानाही विधेयक मंजूर करण्यात आलं. या संबंधित विधान परिषद सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात भीक मागणं बेकायदेशीर ठरणार आहे.
विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे कायदेशीर गुन्हा ठरेल. तसेच पुनर्वसन, सुधारणा व सामाजिक संरक्षणासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याचाही प्रस्ताव या कायद्यात आहे.



