संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनांचे योगदान महत्वाचे – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. विविध पक्ष आपल्या विचारधारेप्रमाणे लोककल्याणाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. सामान्य नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि त्यांचे दु:ख मांडण्याचे काम पक्षीय संघटना करते, असे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
नागपूर : विधानभवनात आयोजित ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व, योगदान व जबाबदारी आणि लोकशाहीसमोरील पुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करतांना चंद्रकांत पाटील बोलत होते.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, संसदीय लोकशाहीत खालच्या पातळीवर ग्रामपंचायत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या निवडणुकांमध्ये पक्षीय तत्त्वे नसतात, मात्र इतर सर्व संस्थांच्या निवडणुकांमध्ये विविध पक्ष लढतात. निवडणूक दरम्यान पक्ष आपापली विचारधारा लोकांसमोर मांडतो आणि आपले पदाधिकारी व कार्यकर्ते यांमार्फत विचारधारा नागरिकांपर्यंत पोहोचवतात, ज्याद्वारे नागरिकांचे सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी असते आणि त्या विचारधारेवर आधारित कार्यकर्ते तयार होतात. पाटील म्हणाले, “मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. आमच्या पक्ष संघटनेत प्रत्येक घराचे नियोजन केले जाते. पक्ष संघटना वाढविण्यासाठी हे नियोजन फार महत्वाचे आहे.”
भारतीय राज्यघटनेने लोकशाही दिली आहे. देशातील राज्य लोकशाही पद्धतीने चालते. अशीच लोकशाही पक्ष संघटनेत देखील असणे आवश्यक आहे. कोणतीही एक व्यक्ती दीर्घकाळ पक्ष पदाधिकारी राहू नये, दर तीन वर्षांनी पक्ष संघटनेत बदल व्हावा, असे बदल पक्षीय लोकशाहीला बळकटी देतात. पक्षीय लोकशाहीत मजबूत विचारधारा पक्षाला अधिक मजबूत करते, असे पाटील यांनी नमूद केले.



