देश-विदेश
Trending

Sydney Gun Attack: सिडनीच्या बोंडी बीचवर भीषण गोळीबार, 11 जणांचा मृत्यू; परिसरात दहशत

हा गोळीबार यहुदी धर्माचा आठ दिवसांचा सण ‘हनुक्का’ (Hanukkah Event Attack) सुरू होण्याच्या पहिल्याच रात्री झाला.

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील प्रसिद्ध बोंडी बीच परिसरात झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेत किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, दोन हल्लेखोरांनी 50 राउंडहून अधिक गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा गोळीबार यहुदी धर्माचा आठ दिवसांचा सण ‘हनुक्का’ सुरू होण्याच्या पहिल्याच रात्री झाला. सायंकाळी सुमारे 6.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार), समुद्रकिनाऱ्यावर सणाच्या कार्यक्रमासाठी शेकडो लोक जमले असताना अचानक गोळीबार सुरू झाला.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “घटनास्थळावरील दृश्य अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस (AFP) आयुक्तांशी चर्चा केल्याचेही स्पष्ट केले असून न्यू साउथ वेल्स (NSW) पोलिस आणि आपत्कालीन सेवांसोबत समन्वयाने काम सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच नागरिकांनी NSW पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राने स्थानिक नागरिकांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी 50 पेक्षा जास्त गोळ्यांचे आवाज ऐकले. तर, न्यू साउथ वेल्स पोलिसांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नागरिकांना बोंडी बीच परिसरात जाणे टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असून तपास सुरू आहे.

या घटनेमुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button