
भाजपने ‘कुंभ पर्वातील अमृत वचन’ नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात शहराच्या विकासासाठी पादचारी केंद्रीत रस्त्यांची आखणी, शाळा परिसरात सुरक्षितता सुधारणा, पावसाळी नाल्यांचे व्यवस्थापन, पाणीपुरवठा व केबल नेटवर्क तयार करण्याचे आश्वासन दिले आहे
नाशिक: महापालिका निवडणुकांचा प्रचारात रंग भरण्यास सुरुवात झाली असून विविध पक्षांचा पुढील पाच वर्षांमध्ये आपण शहराला काय देणार आहोत. याची माहिती जाहिरनाम्यातून दिली जात आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचा ’कुंभ पर्वातील अमृत वचन’ या नावाने जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला. भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी हा वचननामा प्रसिध्द केला.
यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार अॅड. राहुल ढिकले, शहर सरचिटणीस नाना शिलेदार, सुनील देसाई, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रसिध्दीप्रमुख पियुष अमृतकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.
विकसित शहरासाठी आम्ही कटिबद्ध
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन प्रगतीसाठी आधुनिक शहरी नियोजन, तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा, डिजिटल प्रशासन, हरित ऊर्जा आणि टिकाऊ पायाभूत सुविधा यांचा व्यापक वापर करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. राज्य शासनाच्या ’स्मार्ट आणि शाश्वत विकसित महाराष्ट्र’ या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून नाशिकला ग्रीन एनर्जी, सोलर उपक्रम, स्मार्ट डेटा-सिस्टम, ई-गव्हर्नन्स, क्लीन टेक्नॉलॉजी आणि हरित पायाभूत सुविधा यांच्या सहाय्याने शहर म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
स्थानिक गरजांशी जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, नाशिक ही केवळ धार्मिक व ऐतिहासिक ओळख असलेली नगरी नसून, भविष्यातील आधुनिक, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शहर म्हणून उभारण्याची अपार क्षमता असलेली महानगरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या अमृतकालाच्या संकल्पनेतला नाशिकच्या स्थानिक गरजांशी जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ‘अमृत वचन‘ मधून दिसून येतो.
व्यवस्थापन हाच आमचा मुख्य केंद्रबिंदू
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, हरित नाशिकच्या दिशेने राजमुंद्री येथून १५ हजार वृक्ष नाशिकमध्ये आणण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संरक्षणातील हे योगदान नाशिकच्या हरित भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. आगामी कुंभमेळा शहराच्या दीर्घकालीन विकासाला नवी दिशा देणारा तर ठरेलच परंतु नाशिकच्या दैनंदिन नागरी गरजांची उन्नती आणि सुयोग्य व्यवस्थापन हाच आमचा मुख्य केंद्रबिंदू राहील.
वचननाम्यातील प्रमुख मुद्दे :
- पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्था मजबूत करणे, पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय
- रस्ते, उड्डाणपूल व वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम
- हरित नाशिकसाठी वृक्षारोपण, उद्यानांचा विकास, पर्यावरणपूरक योजना
- महिला व नागरिक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नेटवर्क, स्मार्ट पोलिसिंग
- युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रे, रोजगारनिर्मितीवर भर
- कुंभ मेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक पर्यटनाचा विकास, साधुसंत व भाविकांसाठी सुविधा
- शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणा, महानगरपालिका शाळा व रुग्णालयांचा दर्जा उंचावणे
भाजपने नाशिकला धार्मिक, सांस्कृतिक तसेच आधुनिक शहर म्हणून विकसित करण्याचा दावा केला असून, विकास आणि हिंदू सांस्कृतिक वारसा यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात आला आहे. येत्या काळात इतर पक्षांचे जाहीरनामेही समोर येणार असून, नाशिक महापालिका निवडणूक प्रचार अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.



