महाराष्ट्र

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत कुत्र्यांचा हैदोस, परिस्थिती गंभीर

महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खास करून मुंबई आणि नागपुरात गंभीर परिस्थिती आहे. या शहरांत गेल्या वर्षभरात एक लाखाहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे.

मुंबई : 2024 मध्ये केवळ मुंबईत 1 लाख 28 हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला, तर नागपुरातही 9,400 पेक्षा जास्त डॉग बाइटची प्रकरणे समोर आली आहेत. ही धक्कादायक माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली.

विधान परिषद सदस्यांनी मुंबई महानगरपालिका (BMC) आणि नागपूर महानगरपालिका (NMC) हद्दीत वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली होती. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नागपुरात 2024 मध्ये 9,427, तर मुंबईत तब्बल 1,28,252 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. हे आकडे अत्यंत चिंताजनक असून सरकार ही समस्या गांभीर्याने हाताळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संख्या घटली, पण चाव्यांचे प्रकार वाढले

BMC आणि अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डाच्या नियमांनुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, 2014 मध्ये मुंबईत 95,172 भटकी कुत्री होती, जी 2024 मध्ये घटून 90,757 झाली आहेत. मात्र, कुत्र्यांची संख्या कमी होऊनही डॉग बाइटच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

नसबंदी, लसीकरण आणि रेबीज नियंत्रणावर भर

राज्य सरकारकडून भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नसबंदी, लसीकरण आणि रेबीज नियंत्रण कार्यक्रम राबवले जात आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या त्वरित निवारणासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

६ वर्षांत ३० लाखांहून अधिक बळी

उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा वर्षांत महाराष्ट्रात 30 लाखांपेक्षा जास्त डॉग बाइटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याचा अर्थ दररोज सरासरी 1,369 नागरिकांना कुत्र्यांचा चावा बसत आहे. तसेच 2021 ते 2023 दरम्यान रेबीजमुळे 30 जणांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांचा वाढता आतंक रोखण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आता अधिकच तीव्र झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button