Indigo Crisis: ‘आम्ही प्रवाशांना निराश केले’ इंडिगो अध्यक्षांची माफी, सांगितले कारण

भारतात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या इंडिगोच्या अव्यवस्थानपणामुळे एअरलाइन उद्योगात मोठी खळबळ उडवली आहे. प्रवाशांना भेडसावलेल्या उड्डाण रद्दी, विलंब आणि अडचणींच्या पार्श्वभूमीवर अखेर इंडिगोचे अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी पुढे येत जबाबदारी स्वीकारली आणि बुधवारी औपचारिक माफी मागितली. यापूर्वी, इंडिगोचे सीईओ यांनीही सार्वजनिकरित्या झालेल्या गोंधळाबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
नवी दिल्ली: देशभरात अचानक इंडिगो विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या संदर्भात आता एअरलाईन्सच अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी त्यांच्या आठ मिनिटांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे प्रवाशांची जाहीर माफी मागितले. ३ डिसेंबरपासून इंडिगोची शेकडो उड्डाणे रद्द झाल्याची त्यांनी यात कबुली देखील दिली. त्यांनी स्पष्टपणे मान्य केले की एअरलाइनने प्रवाशांना “निराश केले” असून निर्माण झालेला गोंधळ कंपनीच्या प्रतिमेवर मोठा धक्का आहे.
जाणूनबुजून गोंधळ निर्माण केल्याचे आरोप फेटाळले
या संपूर्ण प्रकरणात इंडिगोच्या व्यवस्थापणावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान इंडिगोने नवीन नियमांना बगल देण्यासाठी योजनाबद्धरीत्या गोंधळ निर्माण केला असा आरोप त्यांच्यावर झाला. मात्र या आरोपाचे मेहता खंडन करत, ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी अशा सर्व दाव्यांना “पूर्णपणे खोटे” ठरवत म्हटले, “आम्ही जुलै ते नोव्हेंबरदरम्यान बदललेल्या नियमांचे पालन केले आहे. नियमांना बगल देण्याचा किंवा सुरक्षिततेशी तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही.
इंडिगो विमान रद्द होण्याचे काय होते खरे कारण?
मेहता यांच्या मते, किरकोळ तांत्रिक त्रुटी, हिवाळ्यातील वेळापत्रकात बदल, प्रतिकूल हवामान, विमान वाहतूक नेटवर्कमधील गर्दी आणि नव्या क्रू रोस्टरिंग नियमांची अंमलबजावणी या सर्व गोष्टी एकत्र आल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे म्हंटले आहे. या सर्व कारणांनी एअरलाइनच्या कार्यपद्धतीवर ताण निर्माण झाला आणि परिणामी मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करावी लागली.
डीजीसीएने (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे. इंडिगोनेही व्यवस्थापनाला मदत करण्यासाठी बाह्य तांत्रिक तज्ञ नेमण्याची घोषणा केली आहे. हा व्यत्यय का आणि कसा झाला याचा मूळ शोध घेणे आणि अशी परिस्थिती पुन्हा कधीही निर्माण होऊ न देणे हा त्यामागचा उद्देश असणार आहे.
ग्राहकांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करणार
मेहता यांनी कबुल केले की इंडिगोला ग्राहकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. “आमची चूक झाली. तुमचा विश्वास आम्ही परत मिळवणार, पण ते केवळ शब्दांनी नाही, तर कृतींनी सिद्ध करू.” अशा शब्दात त्यांनी ग्राहकांची माफी मागितली.
ही घटना केवळ इंडिगोसाठी नाही तर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठीही मोठा धडा मानली जात आहे. पुढील काही दिवसांत डीजीसीएचा अहवाल, इंडिगोच्या सुधारणा उपाययोजना आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया यावर इंडिगो गोंधळाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.



