देश-विदेश
Trending

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात भाजपचा आवाज, कोलकात्यात तीव्र आंदोलन

बांगलादेशातील मयमनसिंग येथे बंगाली हिंदू युवक दिपू दास यांच्या लिंचिंगनंतर भारतात, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये, या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

कोलकाता : बांगलादेशात एका बंगाली हिंदू युवकाच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने सोमवारी कोलकात्यात बांगलादेश उपउच्चायुक्तालयाजवळ जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी केले.

निजाम पॅलेस ते बेकबागन दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीत विविध पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सुमारे २,००० आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत १८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मयमनसिंग येथे दिपू दास यांच्यावर झालेल्या लिंचिंग आणि त्यानंतर मृतदेह जाळल्याच्या घटनेचा निषेध केला.

यावेळी शुभेंदू अधिकारी म्हणाले की, “दिपू दास यांच्या हत्येत सहभागी असलेल्या सर्व दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. बांगलादेशात हिंदू समाजावर होणारे हल्ले आणि अत्याचार तातडीने थांबवले पाहिजेत.” त्यांनी इशारा देताना सांगितले की, जर या घटना थांबल्या नाहीत, तर २६ डिसेंबर रोजी १०,००० लोकांसह पुन्हा उपउच्चायुक्तालयावर आंदोलन केले जाईल.

अधिकारी यांनी पुढे सांगितले की, या घटनेच्या निषेधार्थ २४ डिसेंबर रोजी हिंदू संघटनांच्या वतीने राज्यभर रस्ते रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.

दरम्यान, याच विषयावर आदल्या दिवशी पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही बांगलादेश उपउच्चायुक्तालयाजवळ स्वतंत्रपणे निदर्शने केली होती. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button