देश-विदेश
Trending

मुंबईत आजही IndiGoच्या फ्लाइट्स रद्द; प्रवाशांचा प्रचंड संताप

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या अव्यवस्थेमुळे संपूर्ण देशातील हवाई प्रवास मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. मुंबई विमानतळावरील परिस्थिती आणखीच गंभीर दिसून आली. मोठ्या प्रमाणावर फ्लाइट रद्द झाल्याने आणि उड्डाणांमध्ये विलंब झाल्याने प्रवाशांची गर्दी इतकी वाढली की विमानतळ प्राधिकरणांना तात्पुरती बसण्याची व्यवस्था करावी लागली. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक आणि बिझनेस ट्रॅव्हलर्स जमिनीवर बसून प्रतीक्षा करताना दिसले.

मुंबई, दि. ६: मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, इंदूर, कोची, आणि तिरुवनंतपुरम यांसह अनेक विमानतळांवर फ्लाइट रद्द आणि विलंबामुळे हजारो प्रवासी तासन्तास अडकून पडले. उशिरा रात्री दिल्ली विमानतळ प्राधिकरणांकडून अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.

इंडिगो एअरलाइनमध्ये आलेल्या अचानक स्टाफ-शॉर्टेज आणि तांत्रिक बिघाडामुळे देशभरातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्याचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. आज एकट्या मुंबई विमानतळावर इंडिगोच्या तब्बल १०९ फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. ज्यात ५१ आगमन आणि ५८ प्रस्थान उड्डाणांचा समावेश आहे. मुंबई विमानतळावर आज सकाळपासून अक्षरशः गोंधळाचे वातावरण आहे. केवळ मुंबईच नव्हे तर चेन्नई, अहमदाबाद तसेच देशातील इतर विमानतळावर देखील इंडिगो फ्लाइट्स रद्द झाल्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

मुंबई विमानतळावर प्रवाशांचा संताप, इंडिगो फ्लाइट्स रद्द

इंडिगो फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१ आणि टर्मिनल-२ दोन्ही ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक प्रवासी आपापल्या गाड्यांसह तासन्तास बाहेरच अडकून पडले आहेत. खरे तर, काल रात्रीपासून इंडिगोचे ऑपरेशन कोलमडले आणि त्याचा थेट देशभरातील विमानतळावर झाला आहे. मुंबईत दिवसभरात १०० पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द झाल्यानं प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. फ्लाइट रद्द करण्यात आल्याची माहिती प्रवाशांना वेळेवर देण्यात आली नाही, त्यामुळे प्रवाशांचा प्रचंड संताप झाला असून, हेल्प डेस्कवरही प्रवाशांची मोठीच मोठी रांग पाहायला मिळत आहे.

दिल्ली IGI विमानतळाने रात्री अ‍ॅडव्हायजरी जारी करून प्रवाशांना घरून निघण्यापूर्वी फ्लाइट स्टेटस तपासण्याचं आवाहन केलं आहे. तर अहमदाबाद विमानतळावर १९ फ्लाइट्स रद्द झाल्या असून, चेन्नईत तर इंडिगोने थेट CISF ला पत्र देऊन “रद्द फ्लाइट प्रवाशांना टर्मिनलमध्ये प्रवेश न देण्याची” विनंती केली आहे. चेन्नईहून आज २९ फ्लाइट्स पूर्ण दिवसासाठी रद्द करण्यात आल्या.

इंडिगोची प्रतिक्रिया: सेवा लवकरच पूर्ववत केली जाईल.

अचानक निर्माण झालेल्या या गोंधळाबद्दल इंडिगोकडून प्रतिक्रिया समोर आली आहे.

कंपनीने सांगितलं आहे की त्यांच्या काही ऑपरेशनल युनिट्समध्ये अचानक स्टाफची उपलब्धता कमी झाल्यानं नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. सेवा हळूहळू पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button