
सध्या लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या माणिकराव कोकाटे यांची अटक तूर्तास टळली असल्याचे चित्र आहे. हायकोर्टाने १ लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटे त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे, कोकाटे यांना तूर्तास जेलमध्ये जावे लागणार नाही.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार माणिकराव कोकाटे यांच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. १९९५ च्या फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणात नाशिकच्या सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती . या निर्णयाला कोकाटे यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून, आज त्यावर सुनावणी पार पडली.
दरम्यान, कोकाटे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं, त्याविरोधात कोकाटे यांनी अटक वॉरंटला आव्हान मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. न्यायालयाने कोकाटे यांच्या वर्तनावर आणि प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कडक शब्दांत निरीक्षणे नोंदवली. दरम्यान या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कोकाटे यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे, सध्या तरी कोकाटे यांना जेलमध्ये जावे लागणार नाही. तसेच, नाशिक न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट तात्पुरते निष्प्रभ ठरले असून अंतिम निकाल येईपर्यंत कोकाटे मोकळे राहणार आहेत.
प्रकरण नेमकं काय आहे?
१९९५ साली नाशिकमध्ये राज्य सरकारच्या १० टक्के आर्थिक दुर्बल घटक (EWS) कोट्यांतर्गत सदनिका मिळवण्यासाठी उत्पन्न कमी दाखवून फसवणूक व बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर आहे. 20 फेब्रुवारी रोजी नाशिकच्या न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी नाशिक सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत कोकाटे बंधूंची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा अंमलात आणण्यासाठी अटक वॉरंट जारी केले. दरम्यान, कोकाटे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांची पथके मुंबईत दाखल झाली होती. मात्र या अटक वॉरंट विरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, आता या प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने अजित पवार गटासाठी हा मोठा राजकीय दिलासा मानला जात आहे, मात्र अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.



