पंतप्रधान मोदींना इथियोपियाचा सर्वोच्च सन्मान, दोन्ही देशांमध्ये ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथियोपियाने आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने, ‘ग्रेट ऑनर निशान’ने गौरवले. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी हे इथियोपियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले विदेशी राष्ट्रप्रमुख ठरले आहेत. या सन्मानामुळे भारत–इथियोपिया मैत्रीपूर्ण संबंधांना नवे बळ मिळाले आहे.
अदीस अबाबा: पंतप्रधान नरेंद्र मोदी इथियोपियाची राजधानी अदीस अबाबा येथे आहेत. ते इथियोपियाच्या अधिकृत दौऱ्यावर असून, या दौऱ्यात इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्याशी प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा, भारत–इथियोपिया द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, दहशतवादाविरोधी सहकार्य, व्यापार, गुंतवणूक व विकासात्मक भागीदारीवर चर्चा या उद्देशाने ते तेथे गेले आहेत. याच दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना इथियोपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रेट ऑनर निशान’ प्रदान करण्यात आला.
हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील अतिप्राचीन आणि समृद्ध सभ्यतेकडून मिळालेला हा गौरव आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. हा सन्मान ते सर्व भारतीयांच्या वतीने नम्रतेने स्वीकारत असून, भारत आणि इथियोपिया यांच्यातील भागीदारी घडवून आणणाऱ्या असंख्य भारतीयांचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. इथियोपिया हा पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान देणारा जगातील 28वा देश ठरला आहे.
अदीस अबाबा येथे झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अबी अहमद अली यांच्यात सखोल चर्चा झाली. या चर्चेच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्यासाठी इथियोपियाचे आभार मानले. दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यात इथियोपियाने व्यक्त केलेली संवेदना आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये राजकीय, आर्थिक, संरक्षण, विकासात्मक सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध क्षेत्रांतील संबंध अधिक मजबूत करण्यावर एकमत झाले. बदलत्या जागतिक परिस्थितीत परस्पर विश्वास आणि दूरदृष्टीवर आधारित भागीदारीच भविष्यासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. ग्लोबल साउथकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जात असताना, इथियोपियाची स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि आत्मगौरवाची परंपरा सर्व विकासशील देशांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांनीही भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत आणि इथियोपिया यांचे संबंध समानता आणि ‘साउथ–साउथ सॉलिडॅरिटी’च्या भावनेतून विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आफ्रिकेच्या प्राधान्यक्रमांना भागीदारीच्या केंद्रस्थानी ठेवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि आफ्रिकेच्या हितासाठी भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आवाज उठवत राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या भेटीतून भारत आणि इथियोपिया यांच्यातील संबंध अधिक व्यापक आणि सखोल करण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला. परस्पर सन्मान, समानता आणि सहकार्याच्या आधारावर ही भागीदारी येत्या काळात अधिक मजबूत होईल, असा विश्वास दोन्ही देशांच्या नेतृत्वाने व्यक्त केला.



